पन्हाळगड - पावनखिंड मोहीम... एक ऐतिहासिक अनुभूती
काही वर्षांपूर्वी कुटुंबियांसोबत पावसाळी ट्रीप साठी पन्हाळगडावर गेलो असताना तेथील बाजी प्रभूंच्या पुतळ्याजवळ खूप गर्दी बघायला मिळाली, थोडी चौकशी केल्यावर समजले की त्या दिवशी (१३ जुलै), बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथि होती आणि त्या निमित्त काही ट्रेकिंग संस्थांनी पन्हाळा ते पावनखिंड हा २ दिवसाचा ट्रेक आयोजित केला होता आणि त्या साठी सर्व ट्रेकर्स मंडळी तिथे जमली होती. मुळातच ट्रेकिंग ची आवड असल्यामुळे या ट्रेक बद्दल जरा अधिक चौकशी करून संपूर्ण माहिती मिळवल्यावर समजले की, हा फक्त एक ट्रेक नाही तर ही एक ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम आहे. १६६० साली आषाढ पौर्णिमेच्या रात्री, छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी प्रभू आणि त्यांच्या ६०० मावळ्यांसोबत पन्हाळ्याचा वेढा फोडून एका रात्रीत पन्हाळगड ते विशाळगड हा जवळपास ६० km चा पल्ला गाठला. या दरम्यान त्यांनी कसा अनेक अडचणींचा मुकाबला करत, पाठीमागून येणाऱ्या हजारो च्या सैन्याला चकवा देत डोंगरदऱ्यांमधून हा खडतर प्रवास केला असेल याचा एक अंशतः अनुभव घेण्यासाठी आणि या सर्व वीरांना श्रद्धांजली म्हणून दर वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये अनेक ग्रुप्स ही मोहीम आयोजित करतात. ही सर्व माहिती घेतल्यानंतर माझ्या सारखा निस्सीम शिवभक्त आणि ट्रेकर हा अनुभव घेतल्याशिवाय राहणे शक्यच नव्हते. आणि मग काय, पुढल्याच वर्षी ही मोहीम पार पडायचे मनात निश्चित करूनच पन्हाळगडाचा निरोप घेतला.
पुढील २ वर्ष corona मुळे या मोहीमा होऊ शकल्या नाहीत याची मनात हुरहूर होती. परंतु सुदैवाने त्या नंतर लगेचच या वर्षी मला मोहीमेत सहभागी होण्याची उत्तम संधी चालून अली. इचलकरंजी येथील गिरिभ्रमण ही संस्था गेली १६ - १७ वर्ष अव्याहतपणे ही मोहीम राबवते आहे तशी त्यांची या वर्षीची मोहीम २२-२३ जुलै ला होणार असल्याची माहिती मला माझ्या एका काकांकडून (श्री गजानन पारनाईक) समजली. ते स्वतः बरेच वर्ष या संस्थेचे सदस्य आहेत आणि यंदाच्या मोहीमेच्या प्रमुख आयोजकांमध्ये ते असल्यामुळे माझे काम अगदी सोपे झाले. माझ्या वतीने सर्व formalities त्यांनीच पूर्ण केल्या आणि मला मोहीमेची तयारी सुरु करायला सांगितले. बरेच वर्ष ट्रेकिंग न केल्यानी फिटनेस आपसूकच कमी झालं होता. आणि इथे तर २ दिवसात जवळपास ५० km चालायचे असल्यामुळे Physical fitness आणि Stamina वाढवणे आवश्यकच होते. त्यासाठी, मिळालेल्या महिन्याभराच्या अवधीचा मी पुरेपूर फायदा घेतला आणि चालण्याचा भरपूर सराव करून मोहिमेसाठी स्वतःला Physically आणि mentally सज्ज केले.
दिवस १ - पन्हाळगड ते करपेवाडी (२७ km)
मोहीमेच्या दिवशी सकाळी ८ वाजता आम्ही गिरिभ्रमणने ठरवून दिलेल्या बसने कोल्हापुरातून पन्हाळ्याला येऊन पोहोचलो. येथील वीर शिवा काशीद आणि श्री बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पुढे मोहीमेला सुरुवात होणार होती. सकाळी ८ वाजल्या पासूनच गडावर शिवभक्तांची एकच झुंबड उडाली होती. गिरिभ्रमण संघटनेतर्फे या वर्षीच्या मोहीमेत विक्रमी तब्बल ६८० मावळे सहभागी होणार होते शिवाय इतर काही संघटनां मधूनही अनेक लोक आमच्या सोबत असणार होते. पन्हाळगडावरच माझी भेट पुण्याहून आलेल्या ३ उत्साही तरुण सदस्यांशी (समर्थ, हृषीकेश आणि वेदांग) झाली आणि आमचा मस्त ग्रुप जमला जो पुढे संपूर्ण मोहीमेत एकत्र राहिला.
साधारण १०.३० वाजेपर्यंत सर्व सदस्यांचे नाश्ता आणि चहापान झाल्यावर, श्री बाजीप्रभू यांचा पुतळ्याला मनोभावे वंदन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज की Sss जय... छत्रपती संभाजी महाराज की Sss जय... आणि हर हर Sss महादेव.. च्या घोषणा देत अतिशय उत्साहात आमच्या मोहीमेला सुरुवात झाली. सकाळपासूनच तुफान पाऊस कोसळत असताना देखील संपूर्ण पन्हाळगड शिवमय झालेला बघायला मिळत होता आणि तब्बल १००० मावळ्यांच्या गर्जनांनी आसमंत निनादून गेला होता. खरंच, मन भारावून टाकणारा अनुभव होता तो !
बाजी प्रभूंच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोहिमेचा श्री गणेशा ! |
या मोहीमेदरम्यान वजनदार बॅग्स बरोबर घेऊन चालणं कठीण असल्यामुळे सर्वांनी आपापल्या मोठ्या बॅग्स ट्रक मध्ये टाकून मुक्कामी पाठवल्या होत्या आणि आपल्या सोबत फक्त पावसाळी कपडे, पाण्याची बाटली आणि कोरडा खाऊ असलेली एक लहान बॅग घेतलेली होती. ग्रुपचे मानाचे ध्वजधारी पथक मोहिमेत अग्रेसर होते आणि बाकी सर्वजण त्यांचा पावलावर पाऊल टाकत निघालो होतो. पन्हाळगडावरील आकाशवाणी केंद्राजवळून मुख्य रस्ता सोडून एक पाऊलवाट आम्हाला लागली आणि त्या वाटेने आम्ही पन्हाळगड उतरायला सुरुवात केली. या वाटेने थोडे अंतर गेल्यावर ती अधिकच अरुंद झाली आणि एका घनदाट जंगलामध्ये शिरली. अशा या जंगलाने वेढलेल्या, तीव्र उताराच्या आणि पावसामुळे अतिशय निसरड्या झालेल्या पायवाटेवर कुठेही न धडपडता चालताना अनेकांची तारांबळ उडत होती. मोहीमेच्या या सुरवातीच्या टप्प्यात सर्वचजण अतिशय उत्साहात, शिवरायांची गाणी म्हणत आणि जोरदार घोषणा देत निघाले होते. जवळपास अर्धा तास या मळकट वाटेवरून चालल्यावर, अखेरीस पन्हाळगड उतरून आम्ही डांबरी रस्त्यावर येऊन पोहोचलो जो पुढे आम्हाला मसई पठार कडे घेऊन जाणार होता. या रस्त्यावर झळकणारे मोहीमवीरांचे स्वागत करणारे मोठाले होर्डिंग्स पाहून आम्हाला या मोहिमेच्या लोकप्रियतेची जाणीव झाली.
मसई पठाराच्या सौंदर्यदबद्दल खूप ऐकलेले असल्यामुळे तिथे लवकरात लवकर पोहोचायच्या उत्सुकतेपोटी आपसूकच पायांनी गती घेतली होती. पुढे डांबरी रस्त्यावरून काही अंतर गेल्यानंतर आम्हाला उजव्या बाजूला या मोहीमेतील मार्गदर्शक दगडी निशाण दिसले. या खुणेनुसार आम्हाला डांबरी रास्ता सोडून, कडेच्या भातशेतांमधून वाट काढत मसई पठाराच्या दिशेने जायचे होते. ट्रेकर्स च्या मदतीसाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक खुणा संपूर्ण मोहीमेत ठराविक अंतरावर आपल्याला आढळतात. याच ठीकाणी मार्गदर्शक निशाणीसोबत अजून एक छोटा दगडी स्तंभ आम्हाला दिसला आणि त्यावर कोरलेले "शिवा काशीदांची पालखी हौतात्म्याकडे निघाली..." हे अप्रतिम वाक्य वाचून मन भरून आले. याच ठिकाणावरून शिवाजी महाराजांचा वेष परिधान केलेल्या वीर शिवा काशीद यांची पालखी महाराजांना अखेरचा मुजरा करून सिद्धी जौहरच्या भेटीसाठी मलकापूरकडे रवाना झाली आणि शिवाजी महाराजांची पालखी, बाजीप्रभू आणि बांदलसेनेसह विशाळगडाकडे विशाळगडाकडे निघाली. त्या ऐतिहासिक जागेवर उभे राहून, वीर शिवा काशीद यांच्या धैर्याला आणि बलिदानाला शतशः प्रणाम करून आम्ही पुढे मसई पठाराच्या दिशेने निघालो. अशीच अप्रतिम आणि प्रेरणादायी वाक्य लिहिलेले स्तंभ संपूर्ण मोहीमेत अनेक ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. हाच रस्ता भातशेतीच्या बांधा-बांधाने जात एका उंच डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. पुढील चिखलाने भरलेली खड्या चढणीची ती वाट पाहून, इथे आमच्या stamina चा चांगलाच कस लागणार याची आम्हाला जाणीव झाली आणि एक दीर्घ श्वास घेऊन आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. जवळपास तासाभराच्या खडतर चढाई नंतर धडपडत आणि अनेक दगडांना ठेचकाळत आम्ही मसई पठाराच्या सुरवातीला असणाऱ्या महाळुंगे गावातील डांबरी रस्त्याला लागलो आणि तिथून काही मिनिटातच निसर्गानी सजलेल्या अशा "World Famous" मसईच्या पठारावर येऊन पोहोचलो.
मोहिमेतील खडतर मार्ग आणि त्यावरील मार्गदर्शक खुणा |
पन्हाळगडापासून साधारण ७-८ km अंतरावर असणारे मसईचे पठार हे खरोखरच निसर्ग सौंदर्याची जणू खाणंच होते. क्षितिजा पर्यंत पसरलेले हे हिरवेगार पठार, त्या हिरवळीवर पांढऱ्या-पिवळ्या रानफुलांनी केलेले नक्षीकाम, सोसाट्याचा वारा आणि बारीक पावसामुळे संपूर्ण पठारावर पसरलेली धुक्याची चादर हे विलोभनीय दृश्य पाहून डोळ्याचे पारणे फिटले. निसर्गाचे हे अनोखे रूप डोळ्यात साठवत आम्ही जसजसे पुढे जात होतो, तसतसे इथले सौंदर्य अधिकच खुलत होते . वाटेवर ठीक ठिकाणी अनेक ग्रुप्स चे फोटो सेशन चालू होते तर काही ग्रुप्स पावसाच्या साठलेल्या पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटत होते. अर्थातच आम्ही देखील त्याला अपवाद नव्हतो. मसई पठाराचे हे सौंदर्य शब्दात वर्णन करण्या-पलीकडचे होते आणि त्यामुळेच शक्य तितके ते Camera मध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पठारावरील सौंदर्य आणि मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला होता आणि सकाळपासूनच्या खडतर प्रवासाचा थकवा कधीच निघून जाऊन सर्वजण पुढच्या प्रवासासाठी ताजेतवाने झाले होते.
पुढील तासभर आम्ही या ४ -५ कमी अंतरावर पसरलेल्या विस्तीर्ण पठारावरून, आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत चालत होतो. काही वेळातच, पठाराच्या मध्यावर एकाकी उभ्या असलेल्या प्राचीन मंदिरातील मसाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही पठाराच्या दुसऱ्या टोकावर येऊन पोहोचलो आणि तिथून उतरणीच्या मार्गाला लागलो. इथून पुढे काही अंतर उतरून गेल्यावर साधारण ३ वाजता च्या सुमारास आम्ही कुंभारवाडी गावातल्या डांबरी रस्त्यावर येऊन पोचलो. गिरिभ्रमण ग्रुप च्या आयोजकांनी आधीच गावात पोहचून जेवणाची सर्व व्यवस्था गावातील शाळेच्या आवारात केली होती. एवढी पायपीट करून आल्यानंतर कडकडून भूक लागलेली होतीच त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आम्ही जेवणावर ताव मारला. झणझणीत मटकीची उसळ आणि पोळीचे स्वादिष्ट जेवण झाल्यावर एक छोटीशी डुलकी काढण्याची खूप इच्छा होत होती पण अजूनही दिवसातले अर्धे अंतर बाकी होते आणि अंधाराच्या आत मुक्कामी पोहचायचे होते त्यामुळे फार वेळ विश्रांती न घेता आम्ही जेवण करून १०-१५ मिनिटातच आम्ही पुढचा प्रवास सुरु केला.
निसर्ग सौंदर्याने नटलेले मसईचे पठार ! |
कुंभारवाडी सोडल्यानंतर पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरून आमचा प्रवास सुरु झाला. या मार्गावरून जाताना, गप्पांच्या ओघात ३५० वर्षांपूर्वी याच ठिकाणी घडलेल्या रक्तरंजित इतिहासाच्या आठवणी निघाल्या आणि मन सुन्न होऊन गेले. आज आपण इतक्या वर्षानंतर सर्व सुखसोयींनीशी या पन्हाळा-पावनखिंड मार्गावरून जातो आहोत, इथले जंगल आता विरळ आहे, इथे काही ठिकाणी आता डांबरी रस्ते झाले आहेत, आपल्या पायामधे उत्तम ग्रीप चे शूज आहेत, पावसापासून संरक्षक Raincoat आहे, अतिशय किरकोळ सामान आपल्या खांद्यावर आहे आणि तरीही आपल्याला हे अंतर २ दिवसांमध्ये पार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे परंतु, १६६० साली महाराज आणि त्यांचे ६०० मावळे रात्रीच्या काळोखात,जनावरांनी भरलेल्या जंगलातून, अनवाणी, तुफान पावसात चिंब भिजत, पाठीवर तलवारी आणि भाल्याचे वजन पेलत आणि मागे शत्रूचे हजारोंचे सैन्य असताना या डोंगर-दऱ्यातील अनवट वाटांवरून धावत, अवघ्या एका रात्रीमध्ये पावनखिंडी पर्यंत पोहोचले आणि तिथे ३ प्रहर कसे झुंजले असतील याची कल्पना करून देखील अंगावर काटा येत होता. खरोखरच धन्य ते महाराज, त्यांचे स्वामीनिष्ठ मावळे आणि धन्य त्यांची स्वराज्यनिष्ठा. आज आम्हाला त्यांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या या मार्गावरून जाण्याचा अनुभव घेता येतोय हे आमचे भाग्यच. असाच इतिहासाला उजाळा देत या डांबरी रस्त्यावरून चालत चालत आम्ही खोतवाडी मध्ये येऊन पोहोचलो. खोतवाडी मधील तिठ्या वरून उजवीकडे वळून काही अंतर गेल्यावर पुन्हा एक खुणेचा दगड दिसला आणि या ठिकाणी डांबरी रस्ता सोडून पुन्हा एकदा चिखल आणि पाण्याने भरलेल्या भात-खेचारातून वाट काढत आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. अशातच पावसाचा जोर आता अधिकच वाढला होता त्यामुळे सर्वांची चाल मंदावली होती आणि पाय पण आता चांगलेच बोलायला लागले होते. अजूनही आम्हाला ४-५ km अंतर पार करून मुक्कामी पोहचायचे असल्यामुळे आम्ही शक्य तेवढ्या वेगानी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. बघता बघता आम्ही चापेवाडी, मंडलाईवाडी, धनगरवाडी मागे टाकत आजच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो. इथून पुढील रस्ता हा घनदाट जंगलातून जाणारा होता आणि या जंगलामध्ये जळू लागण्याची शक्यता असल्यामुळे आम्हाला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागत होते. हे जंगल डोंगर उतारावरील उंच उंच झाडांनी भरलेले असल्यामुळे येथील वाट थोडी अंधारी होती आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ती अधिकच अंधुक झाली होती. दुष्काळात तेरावा महिना यावा तसे या जंगलातून जाताना वाटेत आम्हाला २ तुडुंब भरून वाहणारे ओढे लागले. जवळपास गुढगाभर पाणी असणारे हे ओढे आम्ही एकमेकांचे हात धरून, मानवी साखळी करून कसेबसे पार केले आणि सुटकेचा निश्वास टाकला. (पुढे दुसऱ्या दिवशी आम्हाला समजले, हे ओढे म्हणजे तर केवळ "Trailer" होता असली "Picture" तर उद्या अनुभवायचा होता).
पुढे तासाभरात आम्ही हे जंगल ओलांडून सपाट रस्त्याला लागलो आणि इथून पुढे १० - १५ मिनिटातच आमचे मुक्कामी ठिकाण करपेवाडी आम्हाला नजरेच्या टप्प्यात दिसू लागल्यावर सर्वानाच हायसे वाटले. गावात पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ६ वाजले होते आणि अशातच गावात पोहोचताच मिळालेला वाफाळणारा चहा आम्हाला अमृततुल्य वाटला. दिवसभराच्या (२७ km) अखंड पायपिटीनंतर नंतर चिखल आणि पाण्याने भरलेले shose काढून, मोकळ्या पायाने निवांत बसून, समाधानाने तो गरमा गरमा चहा पिण्याचा आनंदच काही और होता. करपेवाडीतील प्रत्येक घरामध्ये त्या दिवशी मोहीमवीरांच्या राहण्याची सोय केलेली होती. काही घरात १०, काही घरात २० च्या ग्रुपने सर्वांची व्यवस्था लावण्यामध्ये गिरिभ्रमण चे आयोजक व्यस्त होते. गावातील शाळेच्या आवारातही मांडव टाकून राहण्याची सोय केली होती. पावसाच्या जोरदार सारी अधूनमधून कोसळत असल्यामुळे थोड्या वेळातच थकले-भागलेले सर्व मोहीमवीर गावातील घराघरांमध्ये निवांत पडून दिवसभरातल्या आठवणींना उजाळा देण्यात मग्न झाले. काही घरांमधून गप्पांचे/ हसण्या खिदळण्याचे आवाज तर काही घरातून शिवरायांचे पराक्रम सांगणारे पोवाडे ऐकू येऊ लागले. आम्ही चौघेही जेवण तयार होईपर्यंत जरा Streching करून आखडलेले शरीर मोकळे करून निवांत गप्पा मारत पहुडलो. दुसऱ्या दिवशीदेखील असाच २० - २२ km चा प्रवास असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ अराम करून सकाळी लवकर उठणे भागच होते. त्यामुळे फार timepass न करता ८.३० वाजताच गरम गरम डाळ-भात आणि वांग्याच्या भाजीचे भरपेट जेवण करून आम्ही लगेचच अंथरुणात शिरलो आणि उद्या पावनखिंडीत पोहचून मोहीम फत्ते करण्याची स्वप्न पाहू लागलो.
रानावनांतून, नद्या-नाल्यातुन वाट काढत अथकपणे चालणारे मोहीमवीर ! |
दिवस २ - करपेवाडी ते पावनखिंड (२० km)
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बॅग्स पॅक करून आणि पोटभर नाश्ता करून (packed लाडू आणि चिवडा बरोबर घेऊन) आम्ही ८.३० वाजता करपेवाडीतून बाहेर पडलो. आजच्या प्रवासामध्ये घाटरस्ते आणि चढाई कमी असल्यामुळे कालच्या पेक्षा अधिक वेगाने जाऊन दुपारी जेवायच्या वेळेला पावनखिंडीत पोहचू असाच सर्वांचा अंदाज होता परंतु काल रात्रीपासून लागून राहिलेला पाऊस आज सकाळी देखील कोसळत होता आणि संपूर्ण रस्ता चिखलमय आणि निसरडा झाला होते त्यामुळे सर्वांचाच वेग सुरवातीपासूनच मंदावलेला होता. रात्रीच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेले सर्व मावळे, वरून कोसळणाऱ्या पावसाची न पायाखालच्या चिखलाची पर्वा न करता, छत्रपती शिवाजी महाराज की जय.. छत्रपती संभाजी महाराज की जय.. आणि हर-हर महादेव... च्या घोषणा देत मानाच्या भगव्या ध्वजामागून चालत होते. चालता-चालता वाटेत भेटणाऱ्या मोहीमेतील इतर शिलेदारांची गप्पा मारत, ओळखी वाढवत मजल दरमजल करत आम्ही निघालो होते आणि याचदरम्यान आम्हाला मोहिमेतील सर्वात लहान मावळा (वयवर्षे -५) भेटला. अतिशय उत्साहामध्ये तो एका हातात भगवा झेंडा नाचवत सर्वांच्या पुढे चालत होता. इतक्या लहान वयामध्ये या खडतर मोहीमेत सहभागी झाल्या बद्दल त्याचे आणि त्याचा आई-वडिलांचे करावे तेवढे कौतुक थोडे होते. त्याचाशी गप्पा मारत असताना त्याचा या मोहीमेतील उत्साह, मोहीम पूर्ण करण्याची जिद्द, इतिहासातील घटनांची अचूक माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा नितांत आदर पाहून आम्ही थक्क झालो. काही वेळ त्याचाशी गप्पा मारल्यावर जसे आम्ही पुढे निघालो तसे निलगिरीचे काळेकुट्ट, घनदाट जंगल आम्हाला समोर दिसू लागले. आमच्या ग्रुप लीडर ने सांगितल्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी हे जंगल इतके घनदाट होते की, दिवसादेखील इथे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहचू शकत नसे आणि त्यामुळेच याला अंधारबन असं नाव पडले. गेल्या काही वर्षात झालेल्या जंगल तोडीमुळे आता हे जंगल पूर्वीइतके घनदाट राहिले नसले तरी आतासुद्धा या जंगलातून जाणारी वाट अंधारीच होती. या जंगलातून जाताना मोहीमवीरांना किंवा इतर ट्रेकर्सना रस्ता सापडणे सोपे व्हावे म्हणून ठराविक अंतरावर काही झाडांना भगव्या रंगाच्या रिबीन बांधल्या होत्या त्या खुणांना follow करतच आम्ही पुढे निघालो होतो. याशिवाय जंगलामध्ये जळवांचे प्रमाण अधिक असल्यामुळे प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाकणे आवश्यक होते. बघता बघता निलगिरीच्या या जंगलाचा पहिला टप्पा पार करून आम्ही एका सपाट भागावर पोहोचलो आणि आजूबाजूला उजेड बघून जरा हायस वाटलं. सकाळपासून जवळपास अडीच-तीन तासाची पायपीट झाल्यामुळे आता पायांना थोड्या आरामाची आणि शरीराला थोड्या energy ची गरज होती. सुदैवाने पावसानी पण जरा विश्रांती घेतल्यामुळे, आम्ही जवळच्या झाडाखाली बसून थोडासा कोरडा खाऊ आणि Packed Breakfast पोटात ढकलला आणि ताजेतवाने होऊन पुन्हा चालायला सुरुवात केली. काही अंतर या सपाट आणि गवताळ (Green grass patch) पठारावरून चालत गेल्यानंतर आम्ही आंबेवाडी गाव पार करून रिंगेवाडी गावात येऊन पोहोचलो. आज रविवारची शाळेला सुट्टी असल्यामुळे गावातील शाळकरी मुलं रस्त्याचा कडेला उभे राहूंन आमच्याकडे कुतूहलाने पाहत होती. आमच्या ग्रुप मधील काही सदस्य, गावांतील मुलांना पेन - पेन्सिल, खोडरबर, वह्या, गोळ्या-बिस्कीट असे साहित्य वाटत होते. या डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्या अजूनही शहरीकरणापासून लांबच आहेत. इथल्या कुटुंबाना उत्पन्नाची साधने मर्यादित असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि त्यामुळेच ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि थोडासा आर्थिक हातभार लागावा यासाठी अशा निस्वार्थी भावनेने केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद होता.
मोहिमेतील सर्वात खडतर टप्प्यातील मळकट वाटा ! |
या सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन आणि छोट्या दोस्तांचा निरोप घेऊन रिंगेवाडीमधून आम्ही पुन्हा एकदा भात शेतांच्या बांधाबांधाने चालू लागलो. या बांधावरून जात असताना पाय घसरून शेतात पडून पिकाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत चालण्याची मोठी कसरत करत आम्ही पाटेवाडी पर्यंत येऊन पोहोचलो. गावातील नळावर चिखलाने माखलेले Shoes आणि Socks स्वच्छ धुवून आणि थोडे फ्रेश होऊन आम्ही पुढे निघालो. पाटेवाडी नंतरच या मोहिमेचा खरा थरार सुरु होणार होता आणि या मोहिमेतील सर्वात खडतर आणि Challenging अशा चिखलाने माखलेल्या, घसरणीच्या वाटेवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. सकाळपासून कोसळणारा पाऊस अजूनही विश्रांती घेण्याचे नाव घेत नव्हता आणि वाटेवर ठीक ठिकाणी पाणी साठून गुढगाभर चिखल झालं होता. अशा मोठमोठ्या दगड-धोंड्यांच्या सड्यामधून आणि चिखलाच्या साम्राज्यातून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतॊ. जिथे चिखल थोडा कमी होता तिथे वाट निसरडी झालेली असल्यामुळे अनेक जणांना रस्त्यावर लोटांगण घालावे लागत होते. थोडे अंतर घोटाभर चिखलातून चालल्यानंतर, shoes मध्ये पूर्ण चिखल भारत होता आणि पुढे गुडघाभर पाण्याचा एखादा ओढा लागला की shoes परत स्वच्छ धुतले जात होते. असा हा चिखल - पाण्याचा खेळ आम्हाला पुढे बराच वेळ बघायला मिळाला. साठलेल्या चिखलामुळे आणि पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज बांधता येत नव्हता आणि त्यामुळे २-३ वेळा माझाही पाय गुढघाभर खोल खड्ड्यात अडकला होता पण नशिबाने काही इजा झाली नाही. इतका खडतर रस्ता असतानाही मावळ्यांचा जोश मात्र कायम होता आणि मोहीम पूर्ण करण्याच्या इर्षेने प्रत्येक जण या दगड धोंड्यातून मार्ग काढत, चिखल तुडवत पुढे चालत होता आणि हीच या मोहिमेची खरी मजा होती. या वाटेवरील जवळपास ८-१० लहान मोठे ओढे पार करत कसे बसे आम्ही तिथून पुढे आलो आणि ही वाट एका छोट्या जंगलामध्ये शिरली. डोंगर उतारामुळे या जंगलातील पायवाटांना देखील ओढ्यांचे स्वरूप आलेले होते आणि आता त्यामधून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. दोन्ही बाजूनी गर्द झाडी, मध्ये पायवाटेवरून वेगाने वाहणारे पाणी आणि अशामध्ये आपले दोन्ही पाय फाकवुन, वाटेच्या दोन्ही बाजूंला असणाऱ्या बांधावर ठेवून हळू हळू चालण्याचे नवीन कसबही आम्ही इथे आत्मसात केले. या जंगलातून चालत असताना, एका बाजूने आम्हाला सतत जोराने कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज कानावर येत होता पण गर्द झाडीमुळे पाण्याचा प्रवाह दिसत नव्हता आणि शेवटी हे जंगल संपताच समोर तुफान वेगाने खळखळणारा या प्रवासातील सर्वात मोठा ओढा आमची वाट अडवून उभा होता. हेच ते पांढरे पाणी , ज्याचा उल्लेख आपल्याला या मोहीमेच्या इतिहासातही आढळतो. इतक्या पावसामध्ये देखील या ओढ्याचे पाणी कायम पांढरे स्वच्छ दिसते आणि म्हणूनच याला "पांढरे पाणी" नाव पडले असावे. या ओढ्याची रुंदी साधारण १५-१० फूट आणि खोली २ फूट असावी. पाण्याच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असल्यामुळे हा ओढा पार करण्यासाठी आमच्या ग्रुप लीडर्सनी आधीच इथे Rope बांधली होती. त्याचा बाजूने उभे राहून हे लीडर्स प्रत्येकाला सुखरूप पलीकडे पोहोचवत होते आणि कोणतीही दुर्घटना होऊ नये याची सर्वतोपरी काळजी घेत होते. सर्वजण शिस्तीने या Rope च्या आधाराने, सावकाश एकामागून एक हा छोटा River crossing चा थरार अनुभवत होते आणि पलीकडे पोहोचलेले बरेच जण हा थरार Camera मध्ये capture करत होते.
पांढरे पाणी येथील River Crossing चा थरार ! |
हा ओढा म्हणजे या मोहीमेतील अंतिम अडथळा मानला जातो आणि तो ओलांडल्यानंतर मात्र सर्वानाच आता वेध लागले होते ते पावनखिंडीचे. इथून पुढे काही अंतर चालल्यानंतर आम्ही सुकामाचा धनगरवाडा आणि म्हसवडचा धनगरवाडा ओलांडून पांढरपाणी गावात येऊन पोहोचलो आणि अखेरीस या चिखल आणि पाण्याने भरलेल्या वाटांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यावरील डांबरी रस्त्यावर येऊन पोहोचलो. ज्या मोहीमवीरांना इथून पुढे पायी मोहीम करणे शक्य नाही अथवा काही इजा झाली असेल त्या सर्वांसाठी पावनखिंडी पर्यंत गाडी ने जाण्याची सोय करण्यात आली होती आणि त्याचा फायदा घेऊन ग्रुप मधील काही मंडळी गाडीने पावनखिंडीकडे रवाना झाले. आम्ही मात्र संपूर्ण मोहीम पायी जाण्याचा निश्चय पक्का ठेवून डांबरी रस्त्यावरून चालायला सुरुवात केली. पावसाची संततधार अजूनही चालूच होती, परंतु इथून पुढचे ६ km चे अंतर आता डांबरी रस्त्यावरूनच चालायचे होते आणि चिखल व पाण्यातून वाट काढण्याची कसरत आता करायला लागणार नव्हती या आनंदात सर्व जण वेगाने पुढे जायचा प्रयत्न करत होते परंतु पाय मात्र साथ देत नव्हते.
याच ठिकाणी १३ जुलै १६६० रोजी, श्री बाजीप्रभू देशपांडे यांनी बांदल सेनेतील 3०० मावळ्यांसह तब्बल ३ प्रहर सिद्धी जोहरच्या प्रचंड सैन्याशी निकराने झुंज देत त्यांना घोडखिंडीतच रोखून धरले. शत्रूचे असंख्य घाव अंगावर झेलल्यानंतरही, " तोफेआधी न मरे बाजी... सांगा मृत्यूला !" असे म्हणत, शिवाजी महाराज विशाळगडी सुखरूप पोहोचल्यानंतर केलेले इशाऱ्याच्या तोफेचे आवाज ऐकून मगच बाजी प्रभूंनी समाधानाने डोळे मिटले. आणि त्या दिवशी गजापूरची ही घोडखिंड, बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांच्या रक्ताने पावन झाली आणि पुढे "पावनखिंड" या नावाने ओळखली गेली. अशा रक्तरंजित इतिहासाची साक्षी असलेल्या या जागेवर उभे राहून त्या नारवीरांच्या पराकोटीच्या शौर्यापुढे आणि त्यागापुढे नतमस्तक होताना आमच्या सर्वांच्याच डोळ्यात पाणी तराळले होते आणि तोंडून आपसूकच छत्रपती शिवाजी महाराज की SSS जय , हर-हर SS महादेव च्या घोषणा येत होत्या. अशा भारावलेल्या वातावरणामध्ये काही मिनिटे स्मारका समोर हात जोडून स्तब्ध उभे राहून स्वराज्यसाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात -अज्ञात मावळ्यांना मनोभावे श्रद्धांजली वाहत असताना काल पासूनची संपूर्ण मोहीम आमच्या डोळ्यासमोर येऊन गेली. आलेल्या सर्व अडचणींवर मात करून आपण ही मोहीम फत्ते करून आज या ठिकाणी उभे असल्याचे समाधान प्रत्येकाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.
मोहिमेचा शेवटचा टप्पा आणि पावनखिंड वीर स्मारक ! |
जिथे ही ऐतिहासिक लढाई घडली ती संपूर्ण युद्धभूमी पाहण्यासाठी काही तुटक्या लोखंडी शिड्या उतरून खिंडीतून खाली जात येते परंतु दोन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खिंडीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते आणि हा शिडीचा रस्ता प्रशासनाने बंद केला होता त्यामुळे आम्हाला खाली न उतरता स्मारकापासूनच मागे फिरावे लागले. त्या ठिकाणाहून दिसणारा खिंडीच्या आजूबाजूचा घनदाट जंगलाने वेढलेला परिसर, आणि ज्या वेड्या वाकड्या डोंगरदऱ्या पाहून आजही आपण तिथे जाण्याचे daring करणार नाही अशा ठिकाणी त्या काळात मराठी मावळ्यांनी इतक्या बलाढ्य शत्रूचा सामना करून त्यांना कसा हरवला असेल याची नुसती कल्पना करूनच आमच्या काळजात धस्स झालं. हळू हळू खिंडीमध्ये मोहीमवीरांची गर्दी वाढत होती आणि हा सर्व परिसर " प्रौढ प्रताप पुरंदर... क्षत्रिय कुलावतांस... महाराजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज की Ssss जय " च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. अशा वातावरणातून कोणाचाच पाय निघत नव्हता परंतु परतीचा प्रवास आम्हाला डोळ्यासमोर दिसत होता आणि पुन्हा एकदा त्या सर्व शूर वीरांच्या स्मृतींना मनापासून अभिवादन करून आम्ही त्या जागेचा निरोप घेतला.
खिंडीतून परत निघाल्यावर जवळच मठ गजापूर गावातील शाळेत जिथे जेवणाची व्यवस्था केली होती तिथे जाऊन आम्ही आमच्या मोहिमेची सांगता केली. आमच्या आधी बरेच मोहीमवीर तिथे पोहोचले होते आणि सर्वांच्या चेहेऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि मोहीम फत्ते केल्याचं समाधान स्पष्ट दिसत होतं. मोहीम पूर्ण झाल्यानिमित्त महाप्रसादाचे (शिरा - पुरीचे) खास जेवण आमची वाट पहात होते. दोन दिवसाच्या अथक पायपिटीनंतर अखेरीस मोहीम फत्ते झाल्याच्या आनंदामुळे ते जेवण आम्हाला अधिकच गोड लागलं असावं. जेवणानंतर, गिरीदर्शन च्या आमच्या सर्व ग्रुप लीडर्सचा निरोप घेऊन आणि आयोजकांना भेटून त्यांना मनापासून धन्यवाद देऊन, आम्ही परतीच्या प्रवासासाठी सज्ज असलेलया बसेस मध्ये बसलो आणि पुढे १-२ तासाच्या या प्रवासात संपूर्ण मोहिमेतील आठवणींना उजाळा देत रात्री ८ वाजता कोल्हापुरात पोहोचलो.
ही संपूर्ण मोहीम हा माझ्यासाठी Lifetime Experience ठरला आणि माझ्या ट्रेकिंग च्या bucketlist मधली अजून एक गोष्ट या निमित्ताने Tick झाली. या मोहिमेला एक वेगळेच ऐतिहासिक महत्व तर आहेच पण याशिवाय मोहिमेत तुम्हाला पावसाळ्यातील अनोखे निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते, खडतर trekking चा एक अप्रतिम अनुभव मिळतो, अनेक लोकांमध्ये मिसळण्याची आणि नवीन मित्र जोडण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोहीम फत्ते केल्यानंतर एक वेगळेच समाधान मिळते. अशी ही पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्ताने आणि निसर्गप्रेमीने आयुष्यात एकदा तरी नक्की अनुभवावी.
जय भवानी ... जय शिवाजी !
संपूर्ण मोहिमेचे अतिशय चोख नियोजन आणि मोहिमेदरम्यान केलेल्या उत्तम सोयीबद्दल गिरिभ्रमण, इचलकरंजी या संस्थेच्या सर्व आयोजक टीम चे विशेष आभार. तुम्हीदेखील पुढील वर्षीच्या या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण संस्थेच्या आयोजकांशी संपर्क साधू शकता
श्री. गजानन पारनाईक (इचलकरंजी) - ९८६० ५० ३१ ५६
Comments
असंच लिहीत रहा !!
तुमच्या प्रयत्नामुळे किंवा तुझ्या ब्लॉग मुळे खूप जण प्रभावित होतील नक्कीच ..
पहिल्यांदाच करूनही फारच छोट्या छोट्या तपशीलाच्या नोंदीसह उत्तम वर्णन केले आहेस. मार्ग,अंतर, वाड्यावस्त्या, नियोजन, भूप्रदेश, नकाशा इ.
दुसऱ्या दिवशी फ्रेश कसे झालात, त्यावर पण प्रकाश पाडायचास की! 😅
....
शेत बांधांवरून एका रेषेत चालणाऱ्यांच्या फोटोची पुनरावृत्ती झाली आहे बघ.
...
माझ्या माहितीप्रमाणे, सर्वात मोठ्या ओढ्याचे पाणी पांढरे असले तरी ते पांढरेपाणी नव्हे *पांढरेपाणी* भाग पुढे येतो.
"खिंडीतील मुख्य समाधी स्थळ" ....
"अशा भारावलेल्या वातावरणामध्ये काही मिनिटे समाधी समोर हात जोडून".....
"मोहिमेचा शेवटचा टप्पा आणि पावनखिंड समाधीस्थळ !"......
- समाधी आणि स्मारक वेगळ्या असतात. पावनखिंडीत आहे ते *वीरस्मारक*, समाधी नव्हे.
उदा. सिंहगडावर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिकृतीलाच लोक समाधी म्हणतात पण ते *स्मारक* आहे, त्यांची व शेलार मामांची *समाधी* उंबरठ गावात आहे.
.........
सिद्धी जोहरच्या जवळपास ३०,००० सैन्याशी निकराने झुंज देत"----
शिवाजी पळाला अशी बातमी लागूनही हा काहीतरी धोका, बनाव असेल असे समजून सिद्दीने फाजलखान व मुलगा सिद्दी ऊजीजला महाराजांच्या मागावर थोडेच सैन्य देऊन सोडले व आपण पन्हाळ्याचा वेढा तसाच कायम ठेवला.. कारण खरा शिवाजी अजूनही आतच असायचा व आपण वेढा सोडून गेलो की तो पन्हाळ्यावरूनच निसटून जाईल अशी त्याला शंका होती.
त्यामुळे महाराजांच्या पाठलागावर घोडखिंडीच्या युद्धात भरपूर सैन्य होतं हे नक्की पण ३०,००० नव्हतं.
----
लोक शिडी उतरून गेल्यावर केवळ खालच्या त्या वाटेलाच खिंड समजतात.
पण इतक्या शेकडो वर्षांच्या काळात कित्येक भू बदल संभवतात. जमीन, डोंगर दऱ्या खचतात, पायवाटा बदलतात, झाडे उन्मळून पडतात, नवीन येतात..
त्यामुळे युद्ध नेमकं तिथेच झालं, असं नाही सांगता येत. तो सबंध भागच पावन आहे, त्या भागातली पन्नासेक खेडी आम्ही पावनखिंडीत राहतो असे अजून म्हणतात.
Ajinkya tuzya comments madhun naveen ani achuk mahiti milali ani tya pramane badal kele ahet. Dhanyavaad.
You have certainly inspired us.